जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून ई-पास सुविधा
तालुकास्तरावर नागरिकांना होणार उपलब्ध
यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला-
कोव्हिड-19 चा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग जिवाची पर्वा न करता उत्कृष्ट कार्य करीत आहे. तसेच या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी व लॉकडाऊनच्या या काळात प्रत्यक्ष बाहेर जाणे टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येणारी पास आता अधिक सुलभरित्या मिळण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या संकल्पनेतून ‘ई-पास’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी आता जिल्हास्तरावर येणे आवश्यक नसून संबंधित तहसीलदारांना हे अधिकार देण्यात आले आहे.
संगणक शास्त्रात अभियंता आणि व्यवस्थापन शास्त्राची पदवी असलेले तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षे खाजगी नोकरी करणारे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुणे येथील ‘लाईफ फस्ट’ कॉनसेप्ट ॲन्ड टेक्नॉलाजी प्रा. लिमिडेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर शहा यांच्या सहकार्याने अवघ्या चार दिवसात ई-पासची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी पास नागरिकांना जिल्हास्तरावर येऊन घ्यावी लागत होती. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरसुध्दा ताण वाढत होता. यापासून आता सुटका झाली असून नागरिकांना स्वत:च्या मोबाईलवर ई-पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधितांच्या मोबाईलवर पीडीएफ फॉरमेटद्वारे तसेच क्यूआर कोडच्या सहाय्याने एसएमएसद्वारे फोटो ओळखपत्रासह ई-पास देण्यात येते. यात नाव, वाहन क्रमांक, प्रवासाचा दिनांक, जाण्या-येण्याचे स्थळ आणि क्यूआर कोडचा समावेश असतो. विशेष म्हणजे क्यूआर कोडचे पोलिसांकडून डिजीटल व्हेरीफिकेशनसुध्दा केले जाते. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांना अधिकृत करण्यात आले आहे. कोणत्या तालुक्यातून किती ई-पासेसचे वाटप झाले त्याची माहिती जिल्हास्तरावरील डॅशबोर्डवर दिसणार आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कारणासाठी epassyavatmal.co.in या संकेतस्थळावर जावून आवश्यक माहिती भरावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा