लॉकडाऊनच्या काळात काही बाबींना प्रतिबंध
17 मे पर्यंत वाढविला कालावधी
यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला-
महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची मुदत दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविलेली असून शासनाने मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता 17 मे 2020 पर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश दिले आहे.
जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रास खाली दिलेल्या मार्गदर्शक सुचना लागू असणार नाहीत. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील. सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे मधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून व्यक्तींच्या आंतरजिल्हा व आंतर ज्य हालचालीकरीता बंदी राहील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील. तथापी ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्य इतर मेळावे वर प्रतिबंध. सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादींवर बंदी राहील.
यवतमाळ जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश असल्यामुळे रेड झोन क्षेत्राकरीता लागू असलेल्या बाबी. खालीलप्रमाणे आहे. (प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर). याशिवाय खालील बाबीस सुध्दा प्रतिबंध करण्यात आला आहे. सायकल रिक्षा, ॲटो रिक्षा, टॅक्सी (ॲटो रिक्षा आणि सायकल रिक्षासह) आणि कॅब अग्रीग्रेटरच्या सेवा, जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्याबाहेरील बसेस बंद राहतील, केशकर्तनालयाची दुकाने, स्पॉस आणि सलून (ब्युटीपार्लर) प्रतिबंध करण्यात आला आहे.
तर खालील बाबीस अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. आंतर तालुक्यात परवानगी दिलेल्या वाहनांना व व्यक्तींना हालचालीकरीता मुभा राहील. याकरीता तहसीलदार तथा incider commander यांच्याकडून पासेस प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. चारचाकी वाहनामध्ये वाहन चालक वगळून दोन प्रवाशांस परवानगी राहील. टु-व्हीलर वर फक्त एकच व्यक्ती जाण्यास मुभा राहील. जीवनाश्यक वस्तुंचे उत्पादन करणारे युनिटस जसे, औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे त्यासंबंधी लागणारा कच्चा माल, उत्पादन करणारे युनिटे, आय.टी.हार्डवेअरचे उत्पादन, पॅकेजींग सामग्रीचे उत्पादन युनिटे सामाजिक अंतर राखून सुरु ठेवण्याची मुभा राहील.
ग्रामीण भागातील सर्व उद्योग व औद्योगिक युनिटे तसेच सर्व बांधकामे सुरु राहतील. नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील सुरु असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहे व बाहेरून मजूर आणण्याची गरज पडणार नाही, अशी कामे सुरु राहतील. नविनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम. नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहील. तथापी यवतमाळ नगर परिषद क्षेत्र वगळता इतर सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये मार्केट व मार्केट कॉम्प्लेक्स मधील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. ई-कॉमर्स कंपनीद्वारे जीवनाश्यक वस्तू, औषध व वैद्यकीय उपकरणे विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. खाजगी कार्यालये त्यांच्या कार्यालयाच्या एकूण कामगारांना 33 टक्के उपस्थित ठेवून कार्यालय सुरु करता येईल. उर्वरित व्यक्तींना घरून काम करता येईल. सदर कार्यालये सुरु ठेवतांना सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. पोलिस, होमगार्ड, अग्निशमन, आपात्तकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर परिषद, नगर पंचायत कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु राहतील. राज्य शासनाचे इतर विभागाचे सर्व अधिकारी त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी वृदांपैकी 33 टक्के कर्मचारी वृंदासह उपस्थित राहणे आवश्यक राहील. तथापी सार्वजनिक सेवा उपलब्ध होईल, याची खात्री करावी व त्यासाठी आवश्यक कर्मचारी नेमलेला असावा.
मान्सूनपूर्व करावयाची तात्कालीक कामे. (इमारतीचे संरक्षण, शटरींग, वॉटरप्रुफींग, पूर संरक्षण, इमारतीची उपकरणे व स्ट्रक्चरल दुरुस्ती, असुरक्षीत इमारत पाडणे इ. कामे.) करण्यास मुभा राहील. वरील मार्गदर्शक सुचना व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक 29 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये देण्यात आलेल्या सवलती कायम राहतील. तसेच वरील मुभा देण्यात आलेल्या जीवनाश्यक व अत्यावश्यक बाबींसाठी वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजता पर्यंतच राहील. तसेच संचारबंदीचे आदेश दिनांक 17 मे 2020 पावेतो लागू राहतील.
राज्याचे मुख्य सचिव यांनी नमुद केल्यानुसार नागरिकांना पुढील सुचना देण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. मार्गदर्शक सुचनानुसार सार्वजनिक ठिकाणी सर्व व्यक्तींनी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक संस्थाचे, संघटक, व्यवस्थापक यांनी 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास परवानगी देण्यात येऊ नये. अंत्यविधीप्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. दारू, पान, तंबाखू इत्यादीच्या वापरास बंदी राहील. पान, तंबाखुजन्य पदार्थाची दुकाने बंद राहतील. कामाचे ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच कामाचे ठिकाणी मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध असणे आवश्यक राहील. अत्यावश्यक गरजेच्या सभेकरीता आणि आरोग्य हेतू वगळता 65 वर्षावरील व्यक्ती, आजाराने व्याधीग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच थांबावे.
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, कामगार यांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे अनिवार्य आहे. मोठ्या संख्येच्या सभा टाळण्यात याव्यात. कोव्हीड – 19 रुग्णावर उपचार करण्यास अधिकृत असलेल्या जवळपासच्या क्षेत्रातील रुग्णालय, क्लिनिक्सची माहिती व त्याची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. कर्मचारी, कामगारामध्ये कोव्हीड – 19 चे कोणतेही लक्षण आढळून येत असल्यास त्यास ताबडतोब तपासणीसाठी त्वरीत पाठविण्यात यावे. ज्या कर्मचारी, कामगारामध्ये असे लक्षण आढळून येत आहे अशा कर्मचारी, कामगारास वैद्यकीय सुविधा मिळेपावेतो विलगीकरणाचे ठिकाण निश्चित करून त्याठिकाणी ठेवण्यात यावे. प्रतिबंधीत क्षेत्रातून कोणताही व्यक्ती, नागरीक बाहेर येणार नाही तसेच बाहेरील व्यक्ती, नागरीक प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणार नाही. सर्व बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, कामगार, इतर नागरीक यांना आल्यानंतर तालुका समिती (तहसिलदार) यांच्याकडे नोंद करून आरोग्याची तपासणी करून घेतील व आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना 14 दिवस होम क्वॉरनटाईन राहणे बंधनकारक राहील.
वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा