केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा.
मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे निर्देश.
निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन.
यवतमाळ दि. 6 :
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वणी आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक जे.आर. डोडीया, आर्णि, पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक सुशीलकुमार मौर्य तसेच कायदा व सुव्यवस्थाकरीता असलेले निवडणूक निरीक्षक पी. विजयन, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक के. विजयन म्हणाले, निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच दसरा आणि नवरात्र हे धार्मिक सण साजरे होत आहे. दुर्गादेवी विसर्जन सर्वत्र शांततेत पार पडेल, याकडे सर्वांनी गांभिर्याने लक्ष द्यावे. अवैधरित्या होणारी दारु आणि पैशाची वाहतूक आढळल्यास त्वरीत कारवाई करा. या काळात सर्व पथकांनी अलर्ट राहावे. जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असेही ते म्हणाले.
निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना म्हणाले, निवडणुकीत सर्व सुचनांचे पालन करा. निवडणूक आयोगाच्या सर्व महत्वाच्या सुचना वाचून त्याचे अवलोकन करा. निवडणुकीसंदर्भात ऑनलाईन तक्रारीकरीता 'सी-व्हीजील' ॲप तयार करण्यात आले आहे. तक्रारीकरीता नागरिकांनी या ॲपचा वापर करण्यासाठी सर्व यंत्रणेने 'सी-व्हीजील' ॲपबाबत अवगत करावे. तसेच उमेदवारांनी ऑनलाईन सिस्टीमध्ये अर्ज करण्यासाठी 'सुविधा' ॲपचा वापर करावा. निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक कर्मचा-यांनी पोस्टल बॅलेटचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
तर निवडणूक निरीक्षक जे. आर. डोडीया यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, येथे उपस्थित बहुतांश जणांनी यापूर्वी निवडणुकांचे काम केले आहे. असे असले तरी प्रत्येक निवडणूक की नवीन पध्दतीने घ्यायला पाहिजे. निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक निवडणुकीत नवीन सुचना, नवीन पध्दती अवलंबिण्यात येते. ती सर्वांनी आत्मसाद करावी. येणा-या निवडणुका चांगल्या पध्दतीने पार पडणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या तयारीबाबत तर पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षकांना अवगत केले. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगातर्फे एकूण सात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तीन सामान्य निवडणूक निरीक्षक, तीन खर्च निरीक्षक आणि एक कायदा आणि सुव्यवस्था निरीक्षकांचा समावेश आहे.
बैठकीला सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा